अष्टपैलू व्यक्तिमत्व ’शरद पवार’

👉 अष्टपैलू व्यक्तिमत्व ’शरद पवार’

ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर एक नजर टाकूयात. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत शरद पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं. कायम स्वरूपी निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केलेत. खास त्याचा आढावा…

👉 अफलातून स्मरणशक्ती : पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात राहतात. याची अनुभूती अनेकांनी घेतलीय. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर तेथील तसेच अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारांच्या डोक्यात असतात.

👉 माणसं जोडण्याची कला : कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहत नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री आहे.(आता तर ती राजकीय पातळीवरही येऊ पहात आहे.) अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे.

👉 बड्या लोकांशी चांगले संबंध : प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. रतन टाटा असो वा राहूल बजाज किंवा अनिल, मुकेश अंबानी असो वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. पण नाट्य क्षेत्रातील जब्बार पटेल, मोहन आगाशे, मोहन जोशी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.

👉 वाचनाची आवड : पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत. पवारांमुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक चांगली मंडळी राजकारणात आली. ना. धो. महानोर व रामदास फुटाणे यांची उदाहरणं समोर आहेत.

👉 बोलण्यातील नेमकेपणा : पवारांच्या सभा मोठ्या-मोठ्या नसतात. पण त्यांची सभा काही तरी देऊन जाणारी असते. श्रोतृवंदाला बांधून ठेवण्याचे काम ते अतिशय चांगले करतात. प्रसंगी तिखट आणि उपहासही त्यांच्या बोलण्यात नेमकेपणाने येतो. विशेषतः विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना हे प्रकर्षाने जाणवते. समोरच्याचं ऐकून घेऊन ते समजावून घेण्याची त्यांची वृत्ती नेहमी त्यांना अपडेट ठेवते.

👉 शांत व्यक्तिमत्व : टीका झाली तरी शांतपणे झेलण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या राजकारणाच्या चालीही शांत व्यक्तिमत्वाला गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्यालाही लागत नाही.

👉 जबरदस्त अभ्यास : एखाद्या चालीत झालेला पराभव ते लक्षात ठेवून दुसऱ्या वेळी त्यात यश कसे मिळेल ते पहातात. त्यासाठी योग्य अभ्यासही करतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद हे त्याचे उदाहरण आहे. जगमोहन दालमिया यांनी पहिल्यांदा त्यांचा पराभव केल्यानंतर दुसऱ्यांदा मात्र पवारांनी एवढे हुशारीने जाळे विणले की दालमिया यांच्यासारखा मुरब्बीही त्यात अडकला.

👉 नेतृत्वगुणांची पारख : पवारांना नेतृत्वगुणांची चांगली पारख आहे. विविध नेत्यांमधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचे काम शरद पवार यांनी वेळोवेळी केले. त्यातून दिलीप वळसे-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेते महाराष्ट्रात पुढे आले.

👉 50 वर्षांची राजकीय कारकीर्द : देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी शरद पवारांची गणना केली जाते. शेती, क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा सर्वंच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारण, समाजकारणात रमणारे पवार हे क्रिकेटमध्येही तितकेच रमतात हे आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. आपल्या 50 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ-उतारही पाहिले.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?