पत्रकार दिन का साजरा केला जातो?

👉 पत्रकार दिन का साजरा केला जातो?

आज पत्रकार दिन. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या उत्तुंग कार्याला मानवंदना देण्याचा दिवस. 1832 साली याच दिवशी कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो.

कोण होते बाळशास्त्री जांभेकर?

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावात झाला. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यांना आद्यपत्रकारही म्हटले जाते.

आपले सामाजिक विचार समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी ‘बॉम्बेदर्पण’ या इंग्रजी नियतकालिकानंतर ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. समाजातील दुष्ट रुढी व परंपरा तसेच अज्ञान यांना उखडून टाकून समाजाला ज्ञानमार्ग दाखवणे व लोककल्याण साधणे तसेच लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकरंजन करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी दर्पणच्या पहिल्याच अंकात सांगितले होते.

जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. वृत्तपत्राची किंमत 1 रुपया होती. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. दर्पणवर सुरुवातीपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. अशा रीतीने दर्पण साडे आठ वर्षे चालले आणि शेवटी दुर्दैवाने 1 जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

जांभेकरांनी नि:स्वार्थपणे सरकारी नोकरी सांभाळत देशातील चळवळींना हातभार लावत कुणाचेही मिंधेपण न स्वीकारता आर्थिक भुर्दंड सोसत 'दर्पण' चालवले. ध्येयसक्तीपोटी केलेल्या अति श्रमांच्या परिणामी विषमज्वराने मुंबईत त्यांचा 17 मे 1846 मध्ये मृत्यू झाला. अशा या महान आद्यपत्रकारास 'लेट्सअप डिजिटल मॅगेझीन'चा मानाचा मुजरा...

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?