Farming Guidance

Farmers Guidance :

द्राक्ष खरड छाटणी

द्राक्ष काढणीचा हंगाम उशिरा संपल्याने खरड छाटणीलाही उशीर होतो. उशिरा होणाऱ्या खरड छाटणीमुळे बागेत निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती

🍄 उशिराच्या छाटणीमुळे- निर्माण होणाऱ्या समस्या

👉 द्राक्ष बागेस पुरेशी विश्रांती न मिळणे :  द्राक्ष काढणीनंतर द्राक्ष बागेस विश्रांती मिळणे आवश्यक असते. द्राक्ष काढणीनंतर वार्षिक खतांच्या मात्रांपैकी उरलेली दहा टक्के खतांची मात्रा देऊन पाणी सुरू ठेवावे, त्यामुळे मुळांची वाढ होऊन त्याचा फायदा छाटणीनंतर निघणाऱ्या फुटींवर होतो. द्राक्ष बागेत विश्रांती देणे म्हणजे खते व पाणी देऊन वेलीस पुनरुज्जीवित करणे होय; मात्र अनेक द्राक्ष बागायतदार द्राक्ष काढणीनंतर बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात व अप्रत्यक्षपणे ताण देतात, हे पूर्णपणे अयोग्य आहे. विश्रांतीच्या काळामध्ये वेलीतील अन्नसाठ्यातील उत्पादनकाळात झालेला खर्च भरून काढला जातो. विश्रांती कमी मिळाल्याने फुटीच्या वाढीसाठी आवश्यहक ऊर्जा मिळत नाही.

👉  छाटणीपूर्वीच्या मशागतीच्या कामांना वेळ न मिळणे
खरड छाटणी हा द्राक्षवेलींच्या वार्षिक वाढीचा पाया समजला जातो. छाटणीपूर्वी योग्य मशागत करून साधारणपणे 15-20 टक्के मुळ्यांची नवनिर्मिती होणे आवश्यदक असते. बागेस आवश्यपक विश्रांतीचा कालावधी मिळालेला नसल्याने खोल मशागत केल्यास नवीन मुळ्यांच्या वाढीस वेळ लागतो, त्यामुळे उशिरा काढणी झाल्यानंतर मशागतीचे काम करताना जास्त प्रमाणात मुळ्या तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

👉  छाटणीपूर्वी खतांची असणारी कमतरता_ खरड छाटणीपूर्वी मशागतीबरोबर बेसल डोस म्हणून शेणखत व सुपर फॉस्फेटची मात्रा दिली जाते, तसेच सुरवातीस नत्र व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. मात्र, छाटणीच्या घाईमध्ये ही मात्रा द्यायची राहून जाते. अशा परिस्थितीमध्ये विद्राव्य खतांचा वापर करणे योग्य ठरते, त्यासाठी छाटणीनंतर 1 ते 40 दिवस नत्र (युरिया दोन किलो प्रति एकर, प्रति दिवस) द्यावा, 41 ते 70 दिवसांच्या कालावधीमध्ये स्फुरद (फॉस्फरिक आम्ल दोन- तीन लिटर प्रति एकर, प्रति दिवस किंवा इतर स्फुरद खते) खतांचा वापर करावा.

🍄 छाटणीनंतर फुटी निघण्याच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्षवेलीचा पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा ताण असतानाच खरड छाटणी केली गेल्यास फूट निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, तसेच या काळात वाढलेल्या तापमानामुळे वेलीअंतर्गत चयापचय क्रियांचा वेग मंदावतो. तसेच, या कालावधीत पाण्याची कमतरता असल्यास नवीन फुटी जळण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीमध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

👉  एकसारख्या फुटी निघण्यासाठी 20 ते 30 मि.लि. हायड्रोजन सायनामाईड प्रति लिटर या प्रमाणात पेस्टिंग करावे. उन्हे कमी झाल्यानंतरच पेस्टिंग करावे, अन्यथा द्राक्ष डोळ्यास इजा होण्याची शक्ययता असते.

👉  उन्हापासून संरक्षणासाठी शेडनेट तसेच कापडाचा वापर द्राक्ष बागेत केलेला असल्यास ते काढण्याची घाई करू नये. शेडनेटमधील वेलींना एकसारख्या, तसेच सात ते आठ दिवस लवकर फुटी निघतात.

👉  द्राक्ष बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये, मुळांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण वाफसा ठेवावा.

👉  क्षारांच्या सान्निध्यात पांढऱ्या मुळींची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही, त्यामुळे मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये साचलेले क्षार काढून टाकण्यासाठी गंधक पावडर 50 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी. काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचऱ्यास मदत करावी. याचा फुटीसाठी चांगला फायदा होतो.

👉 छाटणीनंतर सातव्या ते आठव्या दिवसापासून रोज दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी करावी, त्यामुळे ओलांड्यावर आर्द्रता निर्माण होऊन एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?