*"बाप म्हणजे नेमकं काय असतं?"*

*"बाप म्हणजे नेमकं काय असतं?"*

*बाप असतो जगातला,*
*पहिलावहिला देव.*
*बाप असतो काळजातली,*
*अनमोल अशी ठेव.*

बाप म्हणजे आईच्या,
डोळ्यांमधलं पाणी.
तिच्या मंगळसूत्रातील
प्रत्येक काळा मणी.

बाप असतो घराचं,
मजबूत असं दार,
घरासाठी स्वतःवर,
झेललेला प्रत्येक वार.

बाप असतो खंबीर,
प्रत्येक वादळ पेलणारा.
मुलांसोबत लहान होऊन
मुलांमध्ये खेळणारा.

बाप म्हणजे थंडगार,
झुळूक मंद वा-याची.
शेकोटीतील मुख्य जागा,
धगधगत्या निखा-याची.

बाप म्हणजे अस्तर आणि
काळीज असतं फाटणारं,
सुखाचं वाण संसारातल्या
प्रत्येकाला वाटणारं.

बाप म्हणजे जीवनातील,
पंचपक्वान्नांचं ताट.
आयुष्याच्या नदीचा,
मजबूत *भक्कम घाट.*

बाप असतो म्हणून असतं,
तुमचं *आमचं नाव.*
बाप असतो धावपळीतील,
एक *विश्रांतीचा गाव.*

बापच देतो आपल्याला,
*जगण्यासाठी हिंमत.*
बाप असतो तोवरच असते,
*समाजामध्ये किंमत.*

बाप नसला की रडू येतं,
संकटात असताना.
आधारवड कोसळलेला,
बापच जवळ नसताना.

कुणाचाही बाप कुणाला,
आयुष्यभर पुरत नाही.
आणि बापाशिवाय आयुष्यात,
बाकी काहीच उरत नाही.

बाप म्हणजे आयुष्यातला,
सुगंधी असा दरवळ.
तो नसता कोमेजून जाते,
घरांमधली हिरवळ.

काळीज कापून काढलं तरी,
बापाला विसरता येत नाही.
बापाइतकं सुख आयुष्यात,
दुसरं कुणीच देत नाही.

ज्याला नाही बाप त्याला,
विचारा त्याची पोकळी.
बापाची जागा आयुष्यभर,
कशी राहते मोकळी.

बाप गेल्यावर प्रत्येकजण,
बाप होऊन जगत असतो.
प्रत्येकाच्या बापामध्ये
स्वतःचा बाप बघत असतो.

बाप असतो *आशीर्वाद,*
आयुष्यभर पुरणारा.
गेल्यावरही मरेपर्यंत,
मनामध्ये उरणारा.

*अशा माझ्या बापाला देवा*
*माझं आयुष्य मिळू दे,*
*हाच बाप पुढच्या जन्मी,*
*पुन्हा मला मिळू दे !*
😘i love u dad😘

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?