ज्ञान-वाणी

🙏🏻🌹 *ज्ञान-वाणी* 🌹🙏🏻
*श्रीज्ञानेश्वरी अकरावा अध्याय*
॥ श्रीज्ञानेश्वर माऊलि समर्थ ॥

   ॥ *विश्वरूपदर्शनयोग*॥

दिशा सगळियाचि गिळाविया ।
चांदिणिया चाटूनि घ्याविया ।
ऐसें वर्तत आहे साविया ।
लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
    सगळ्या दिशा गिळून टाकाव्या की चांदण्या चाटून घ्याव्या, अशा प्रकारचा खरोखर तुझा हावरेपणा दिसत आहे.

जैसा भोगीं कामु वाढे ।
कां इंधनें आगीसि हाकाक चढे ।
तैसी खातखातांचि तोंडें ।
खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
   ज्याप्रमाणे भोगाने भोगवासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नि भडकतो, त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाताखाताच खाखावलेली आहेत.

कैसें एकचि केवढें पसरलें ।
त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें ।
जैसें कां कवीठ घातलें ।
वडवानळीं ॥ ४३३ ॥
   तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे, पहा ! ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवठ घालावे, त्याप्रमाणे हें संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे.

ऐसीं अपार वदनें ।
आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें ।
कां आहारु न मिळतां येणें मानें ।
वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
   अशी ही असंख्य मुखे आहेत. आता तितकी त्रिभुवने कोठली आणणार ? पुरेसा आहार मिळत नसतांना ज्यांचा ताप असहाय्य होतो, अशी मुखे का असंख्य वाढविलीस ?

अगा हा लोकु बापुडा ।
जाहला वदनज्वाळां वरपडा ।
जैसी वणवेयाचिया वेढां ।
सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
     देवा ! ज्याप्रमाणे वणव्याचा वेढा पडून, त्यात जनावरे सापडतात, त्याप्रमाणे तुझ्या मुखांतील पेटलेल्या ज्वालांना बिचारे हे ब्रह्मांड बळी पडले आहे.

*॥जय जय रामकृष्ण हरि॥*

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?