विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान प्रयोगातून विकसित होते,
अध्यात्म योगातून प्राप्त होते.

विज्ञानासाठी साधने वापरली जातात,
अध्यात्मासाठी साधना वापरली जाते.

विज्ञानामध्ये शोध आहे,
अध्यात्मामध्ये बोध आहे.

विज्ञानामध्ये तत्त्वपरिक्षा आहे,
अध्यात्मामध्ये सत्त्वपरिक्षा आहे.

विज्ञानामध्ये व्यासंग आहे,
अध्यात्मामध्ये सत्संग आहे.

विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे,
अध्यात्मामध्ये दातृत्व आहे.

विज्ञानामध्ये शक्ती आहे,
अध्यात्मामध्ये भक्ती आहे.

विज्ञानामध्ये प्रकल्प आहेत,
अध्यात्मामध्ये संकल्प आहे.

विज्ञानामध्ये तंत्रज्ञान आहे,
अध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे.

विज्ञान उपभोगास पोषक आहे,
अध्यात्म त्यागास पोषक आहे.

विज्ञानामुळे पुरुषार्थ घडतो,
अध्यात्मामुळे परमार्थ घडतो.

विज्ञानामुळे प्रतिष्ठा वाढते,
अध्यात्मामुळे निष्ठा वाढते.

विज्ञानामुळे संपन्नता प्राप्त होते,
अध्यात्मामुळे प्रसन्नता प्राप्त होते.

विज्ञानामुळे प्रसिध्दी मिळते,
अध्यात्मामुळे सिध्दी मिळते.

विज्ञानामुळे परिस्थिती बदलते,
अध्यात्मामुळे मनःस्थिती बदलते.

विज्ञानामुळे चातुर्य विकसित होते,
अध्यात्मामुळे चारित्र्य विकसित होते.

विज्ञानामध्ये तपशिलावर भर आहे,
अध्यात्मामध्ये तप व शील यावर भर आहे.

विज्ञानामध्ये पराक्रम आहे,
अध्यात्मामध्ये आत्मसंयम आहे.

विज्ञानामुळे भौतिक विकास होतो,
अध्यात्मामुळे आत्मिक विकास होतो.

विज्ञानामुळे बाह्य सुख प्राप्त होते,
अध्यात्मामुळे अंतरात्म्यातून सुख प्राप्त होते.

विज्ञानामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात,
अध्यात्मामुळे सर्व प्रश्न सुटतात.

विज्ञानामुळे भौतिकता सुधारते,
अध्यात्मामुळे नैतिकता सुधारते.

विज्ञानामुळे धन निर्माण होते,
अध्यात्मामुळे समाधान निर्माण होते.

विज्ञानाकरिता उपकरणाची आवश्यकता,
अध्यात्माकरिता अंतःकरणाची आवश्यकता.

विज्ञान हव्यासाची पेरणी करते,
अध्यात्म ध्यासाची पेरणी करते.

विज्ञान आमचा विश्वास आहे,
अध्यात्म आमचा श्वास आहे.

विज्ञानामुळे कार्यास चालना मिळते,
अध्यात्मामुळे स्व-धर्मास चालना मिळते.

विज्ञानामुळे स्वार्थ निर्माण होतो.
अध्यात्मामुळे परमार्थ निर्माण होतो.

विज्ञानामुळे क्षणिक आनंद मिळतो,
अध्यात्मामुळे कायम स्वरूपाचा आनंद मिळतो.

विज्ञानामुळे जीवनाला गती मिळते,
अध्यात्मामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते.

(last but not the least)
विज्ञान मरायच्या आधी उपयोगी पडते.
अध्यात्म मेल्यानंतर उपयोगी पडते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?