स्वयंपाकघरातील टिप्स...


स्वयंपाकघरातील टिप्स...

🍄 कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून उतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो. हे टाळण्यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे (पाव चमचा) मीठ पण घालावं म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही.

🍄 कणिक मळताना ती परातीत/ताटात न मळता कढई/तसराळे/मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते.

🍄 कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेला/तूपात तळायचे असतील मंद गॅसवर तळायचे असतात किंवा तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतवरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाहीत

🍄 नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी. म्हणजे त्यावर माश्या-चिलटं बसत नाहीत. नकळत पदार्थामध्ये धूळ, किडामूंगी वगैरे पडत नाही.

🍄 नेहमीच्या तूरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक(अगदी ४-५ पाने घातली तरी चालते.) चिरून  घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. आणि त्यायोगे पालकही खाल्ला जातो.                  घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी / काही तोंडी लावणं करायच आहे अशा वेळी जर घरी पालक असेल तर तूरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी व भरपूर पालक चिरून घालावा व चांगला शिजू द्या. ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार.

🍄 कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पिठ १-२ चमचे घालून (१ वाटी भाजी असेल तर १/२ चमचा डाळीचं पीठ या प्रमाणात) घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा.

🍄 कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास, पनीरचे क्यूब्ज करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज १०-१५ मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत ५ मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार.

🍄 कोणताही पुलाव/जिरा राइस/स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा, तांदूळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा/फडफडीत होतो.

🍄 गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.

🍄 काही भाज्या/उसळी/भात करताना तयार (बारीक पूड केलेले) मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी १ चमचाभर तेलात थोडा मसाला (पूड) घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?