दुधाळ जनावरांचा असा असावा आहार..

दुधाळ जनावरांचा असा असावा आहार..

👉  समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे. जनावरांना हिरवी वैरण देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-6 इत्यादींचा समावेश होतो. एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लसूण, बरसिम, स्टायलो, दशरथ गवत ही द्विदल वर्गातील चारापिके आहेत. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

👉 सुक्‍या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा जनावरांच्या आहारात द्यावा. या चाऱ्यांचा उपयोग मुख्यत्वे करून पोटभर वैरण म्हणून केला जातो. ही वैरण कमी पौष्टिक असते.

👉 समतोल आहारामध्ये अंबोण महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण अधिक असते. अंबोण मिश्रणाचा 100 किलो तत्त्वावर नमुना बनवावा. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता अंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्ये वापरली जातात. प्रथिनांचा स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल, खोबऱ्यापासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. याचबरोबरीने भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, तूरचुणी, उडीद चुणी, मूग चुणीचा समावेश होतो.

👉 पशुखाद्यात दोन टक्के खनिज मिश्रण, एक टक्का चुना पावडर आणि एक टक्का मिठाचा समावेश करावा.

👉 पशुखाद्यात साधारणतः 25 ते 35 टक्के पेंड, 25 ते 35 टक्के तृणधान्य, 25 ते 45 टक्के तृणधान्यापासून आणि 20 ते 30 टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ याचा समावेश होतो.

👉 दुभत्या जनावरास पशुखाद्य देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गाईस एक ते 1.5 किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति 2.5 किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे. दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते.

👉 अंबोण जनावरास देण्याअगोदर आठ ते 12 तास भिजून ठेवावे म्हणजे ते रुचकर होते, त्याची पाचकतादेखील वाढते. अंबोण हा घटक खर्चिक असल्यामुळे अंबोणाची बचत केल्यास दुग्धोत्पादन अधिक किफायतशीर होते.

👉 साधारण 10 लिटर दूध देणाऱ्या गाईस 15 ते 20 किलो द्विदल हिरवा चारा, दोन ते तीन किलो मका भरडा, दोन ते चार किलो सुका चारा दिल्यास तिच्या अन्नघटकांच्या गरजा पूर्ण होतात.

👉 आहारातील अंबोणाचा भाग गाई, म्हशींना दूध काढते वेळी द्यावा. हिरवा चारा दूध काढल्याबरोबर आणि कडबा, गव्हाचे काड, सरमाड सारखा सुका चारा कोणत्याही वेळेस दिल्यास हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?