शैक्षणिक कर्ज घ्यायचा विचार करताय? हे वाचाच

शैक्षणिक कर्ज घ्यायचा विचार करताय? हे वाचाच

शिक्षणाचा खर्च वाढत असताना विद्यार्थी त्यासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याचा मार्ग अधिकाधिक करत असल्याचे दिसते. देशात शैक्षणिक कर्ज अधिक लोकप्रिय होत आहे आणि त्यासोबतच एनपीएचा आकडा वाढला आहे. त्यामुळे बँका आता शैक्षणिक कर्ज देताना बरीच सावधगिरी बाळगतात. शैक्षणिक कर्जाचा जास्त बोजा होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

● आधीपासून नियोजन करा
कर्ज घेण्याचे नियोजन तुमच्या अभ्यासाच्या सोबतच झाले पाहिजे. जर तुम्ही परदेशी विद्यापीठासाठी अर्ज करणार असलात, तर आधीपासून मंजूर असलेल्या कर्जाची कागदपत्रे तुमच्या कामी येऊ शकतात, कारण विद्यापीठात अर्जाच्या वेळी तुम्ही फी भरण्यास कसे समर्थ आहात ते विचारले जाऊ शकते. तसेही विद्यापीठाकडून निकाल आल्यानंतर विद्यार्थ्याकडे शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करण्यासाठी तीन ते चार महिन्याचा अवधी असतो. आधीपासून नियोजन केलेले असल्यावर निर्णय घेण्यात घाई करावी लागत नाही, कारण त्यामुळे विविध बँकांच्या कर्ज योजनांचा तौलनिक अभ्यास करता येतो.

● कर्ज घेण्यासाठी बँक लक्षपूर्वक निवडा
भारतात आणि परदेशात अभ्यासासाठी अनेक बँका कर्ज देऊ करत असल्या, तरी तुम्हाला असे कर्ज शोधले पाहिजे ज्यावर व्याजाचा दर तर कमी असेलच पण परतफेडीच्या अटीसुद्धा सोयीस्कर असतील आणि मुदतीपेक्षा आधी कर्ज परत करण्याची मुभा असेल. तसेच बँक निवडण्याआधी अर्जाच्या वेळीचा खर्चसुद्धा पाहा. अधिक कर्ज देणाऱ्या बँकेपेक्षा अधिक सोयीचे कर्ज देणाऱ्या बँकेची निवड करणे केव्हाही फायद्याचेच.

● राहण्याचा खर्च स्वतः करा
जर तुम्ही अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत जाण्याचा विचार करीत असलात, तर तिथे राहाण्याचा खर्च भारतापेक्षा फार अधिक असेल. तो खर्च भागवण्यासाठी विद्यार्थी कर्जाचा आकडा वाढवतात. तसे करण्यापेक्षा इतर मार्ग शोधून पाहा. अनेक विद्यापीठे विद्यार्थ्यांना अंशकालिक काम देऊ करतात, जसे वाचनालय किंवा प्रयोगशाळेत मदतनीस वगैरे. तुम्ही विद्यापीठाबाहेर सुद्धा अंशकालिक काम पाहू शकता. बाहेर राहण्याचा खर्च करण्यासाठी हे पर्याय उपाय ठरु शकतात.

● परतफेडीच्या कालावधीत सूट मिळवा
शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर नोकरी मिळतेच असे नाही. विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर आणि काम मिळण्याआधी किंवा काम मिळाल्यावर लगेच कर्जाची परतफेड सुरू करणे कठीण जाते. अशा परिस्थितीसाठी काही बँका परतफेडीची सुरूवात करण्यासाठी सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी देतात. अशा परिस्थितीत तुम्ही कर्जाची परतफेड त्या कालावधीनंतर सुरू करू शकता. जर तुम्ही या आधीच चांगल्या आर्थिक परिस्थितीत आलात, तर तुम्ही या कालावधीमध्ये व्याजाची परतफेड सुरू करू शकता.

● सर्वात चांगल्या विद्यापीठासाठी प्रयत्न करा
कर्ज मंजूर करण्याआधी बँका विद्यापीठाचे प्रवेश परवानगीचे पत्र, खर्चाचा तपशील, व्हिसाची कागद-पत्रे, शैक्षणिक रेकॉर्ड इत्यादींची मागणी करू शकतात. कर्जाचा आकडा अधिक असल्यास ते कर्जाच्या आकड्यापेक्षा अधिक तारण ठेवण्याची मागणीही करू शकतात. पण जर विद्यार्थ्याला एखाद्या उच्च दर्जाच्या विद्यापीठात शिरकाव मिळाला असेल, तर बँका तारण मागत नाहीत.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.