खिशात बिलकुल पैसे टिकत नाहीत? अहो मग या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा ना!

खिशात बिलकुल पैसे टिकत नाहीत? अहो मग या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा ना!

प्रत्येक मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस महिन्याच्या पहिल्या तारखेची वाट बघत असतो. “Your salary has been credited to your account “ हा मेसेज आला की माणसाला आनंद होतो आणि आता त्या पगारातून सगळी देणी संपल्यावर आपल्या पाकिटात काय उरेल ह्याची चिंता मात्र डोक्याचा भुगा करते. महिन्याच्या शेवटी तर सतत धास्ती असते की कुठला इमर्जन्सी खर्च नको यायला, नाहीतर पंचाईत व्हायची!

दर महिन्याला आपण ठरवतो की पुढच्या महिन्यापासून सगळे वायफळ खर्च बंद आणि बचत सुरु करू. पण ते काही जमत नाही आणि बचतीचं गणित काही जुळत नाही! अशा वेळी जर कुणी बचतीच्या सध्या सोप्या टिप्स घेणे दिल्या तर थेंबे थेंबे करता करता आपण बचतीची मोठी गंगाजळी साठवू शकतो. काही काही खर्च हे अनावश्यक असतात आणि आपण ते थोड्या खबरदारीने नक्कीच टाळू शकतो. बचतीच्या बाबतीत एकदम मोठी उडी घेणे जरी जमले नाही तरी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपल्या खिशाला लागणारी कात्री नक्कीच वाचवू शकतो. पुढील पैकी सगळ्या नाही पण थोड्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर तुमच्या अकाउंट बॅलन्स मध्ये नक्कीच भर पडेल ह्याची आम्ही खात्री देतो

१. कार्ड पेमेंट करणे कमी करा
ही सूचना वाचून खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हल्ली सगळ्या लोकांचा कॅशलेस व्यवहार करण्याकडे कल असतो. आपण सुद्धा कॅश जवळ बाळगायला नको म्हणून कार्डनेच व्यवहार करायला प्राधान्य देतो. अशा वेळी आपण किती आणि काय खर्च करतोय ह्याचा ट्रॅक ठेवणे कठीण जाते. नाहीतरी कार्डनेच पेमेंट करायचं आहे, असा विचार करून बऱ्याच वेळा अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाते, अनावश्यक खर्च होतो. क्रेडीट कार्ड जर व्यवस्थित वापरता आलं नाही तर सगळा पगार त्याचे बिल भरण्यातच जातो. म्हणूनच कार्ड वापरणे कमी केल्यास तुमचा अनावश्यक खर्च होणे काही प्रमाणात कमी होऊन तुमची बचत होण्यास मदत होईल

२. विजेची उपकरणे वापरात नसताना त्याचे प्लग काढून ठेवा.
काही विजेची उपकरणे बंद असताना सुद्धा जर चार्जरने विजेशी कनेक्टेड असतील तर त्याने तुमच्या बिलाची रक्कम वाढू शकते. तुमच्या दर महिन्याला वाढत्या विजेच्या बिलाचे हे ही एक कारण असू शकते. म्हणूनच वापरात नसलेल्या विजेच्या उपकरणांचे चार्जर/प्लग काढून ठेवा जेणे करून ते वीज अनावश्यक खर्च करणार नाहीत. म्हटलं तर गोष्ट एकदम छोटीशी आणि साधी आहे. पण ह्याने तुमच्या विजेच्या बिलात फरक पडून तुमची बचत होऊ शकते.

३. काही नव्या आणि इंटरेस्टिंग ऑफर्स विषयी तुमच्या बँकेकडे चौकशी करा
तुम्ही जर तुमच्या बँकेचे जुने कस्टमर असाल तर बँक तुम्हाला काही स्पेशल ऑफर देऊ शकते. त्याबद्दल तुमच्या बँकेतल्या लोकांकडे वेळोवेळी चौकशी करा. तुमची बँक जर तुम्हाला तुम्ही घेतलेल्या लोन वर किंवा क्रेडीट कार्ड वर किंवा इएमआय वर जर व्याज दर कमी करून देत असेल तर तुमचे बरेच पैसे वाचू शकतात. ह्याने तुमचा बँक बॅलन्स कमी न होता हळू हळू वाढू शकेल.

४. वापरात नसलेल्या गोष्टी विकून टाका
हल्ली काही ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईट ‘6 months break-up challenge’ देत आहेत. म्हणजेच महिनोंमहिने तुम्ही ज्या गोष्टी वापरत नाहीये, त्याकडे बघत सुद्धा नाहीये अशा चांगल्या कंडीशन मध्ये असलेल्या गोष्टी त्यांच्या मोहात न पडता विकून टाका. खरं तर आपण घेतलेल्या गोष्टींसाठी आपल्या हृदयात स्पेशल जागा असते, त्या अशा सहजासहजी विकून टाकणं कठीण काम आहे. पण जर त्यातून तुमचा फायदाच होत असेल तर हे करायला काय हरकत आहे? तुमचाही फायदा होईल आणि ज्याला त्या वस्तूंची खरी गरज आहे त्याला त्या वापरायला मिळतील आणि वस्तू सुद्धा भंगारात पडून राहणार नाहीत.

५. व्हाउचर आणि सेल चा जास्तीत जास्त फायदा करून घ्या
सेल मधल्या वस्तूंची क्वालिटी चांगली नसते, व्हाउचर चा काही उपयोग नसतो असा विचार करू नका. ह्या दोन गोष्टी बचती साठी तुम्हाला कायम मदत करतील. एखाद्या वस्तूची सेल मध्ये किंमत कमी असेल आणि ती तुम्ही घेतली तर तुमचेच पैसे वाचतात. तुमचे महिन्याचे किराणा सामान जर सेल सुरु असलेल्या दुकानातून घेतले तर तुमचाच फायदा होतो.

६. अनावश्यक सदस्यत्व / सभासदत्व बंद करा
कधीतरी कुठल्यातरी ऑफरला भुलून जर कुठल्याही पेपर, मॅगझीनचे सदस्यत्व घेतले असेल किंवा कुठल्यातरी कम्युनिटी क्लब किंवा जिमचे मेंबर असून तुम्ही तिकडे कधीच जात नसाल तर ही सगळी सदस्यत्व रद्द करा. त्यापेक्षा ह्या सगळ्यात उगाच खर्च होत असलेला पैसा जर दुसऱ्या कुठल्या आवश्यक गोष्टीत कामी येत असेल तर तो तिकडे वापरा. ह्याने तुमचा पैसाही वाचेल आणि अनावश्यक खर्चाला सुद्धा काही प्रमाणात आळा बसेल.

७. तुमचा फोन कॉलिंग व इंटरनेट प्लान बदला
तुमच्या घरी आणि ऑफिसमध्ये जर २४ तास अनलिमिटेड वायफायची सुविधा असेल तर तुमच्या मोबाईलचा अनलिमिटेड नेटप्लान बदलून घ्या. जर तुम्ही तो प्लान फारसा वापरतच नसाल तर कशाला त्यावर पैसे घालवायचे? तसाच कॉलिंग चा प्लान सुद्धा अनलिमिटेडचा असेल आणि तुम्ही फारसे कुणाशी फोनवर बोलत नसाल तर कशाला त्यावर पैसे घालवायचे ? ह्या अनलिमिटेड प्लानचे चार्जेस बरेच असतात. त्याचा तुम्ही हवा तसा उपयोग करत नसाल तर ते भरमसाठ बिल कशाला भरायचे? तुमच्या वापराप्रमाणे तुम्ही प्लान बदलून घेतले तर तुमच्या फोनच्या बिलाच्या रकमेमध्ये फरक पडेल आणि तुमची बचत होऊ शकेल.

८. नेहमी नेहमी बाहेरचे खाणे
सतत बाहेरचे खाऊन पोटाला सुद्धा त्रास होतो आणि खिशाला सुद्धा ! म्हणूनच कितीही इच्छा झाली तरी रोज रोज बाहेरचे खाणे चांगले नाही. तुम्ही बाहेर जाताना घरातूनच काही खाऊन निघा, किंवा ऑफिसला जाताना घरून डबा घेऊन बाहेर पडा म्हणजे बाहेर खाण्याची गरज पडणार नाही. बाहेरचे खाऊन आजारी पडल्यावर सुद्धा खर्च वाढू शकतो. म्हणूनच बाहेरचे खाणे टाळा आणि पैसे व शरीर दोन्ही वाचवा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?