अशी करा पासपोर्टची प्रक्रिया

अशी करा पासपोर्टची प्रक्रिया

कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी तर कधी कोणाचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे म्हणून तर काही जण फिरायला जाण्यासाठी पासपोर्ट काढतात. हा पासपोर्ट काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हे माहित असेल तर बराचसा त्रास वाचतो. त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. पाहूया काय आहेत पासपोर्टचे टप्पे

१. ऑनलाईन नोंदणी – पासपोर्टसाठी वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी तुमचा वापरात असलेला मेल-आयडी आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. यानंतर ऑनलाईन डेटा एंट्री आणि ऑफलाईन डेटा एंट्री असे दोन पर्याय उपलब्ध असतात. इंटरनेट असताना फॉर्म भरता येतो. तर ऑफलाईनमध्ये पीडीएफ फाईल सेव्ह करुन नंतर आपल्या सोयीनुसार फॉर्म भरण्याची सुविधा आहे.

२. माहिती भरताना काळजी घ्या – अर्ज भरताना पॅन कार्ड आणि आधार कार्डाची माहिती भरणे बंधनकारक आहे. आता तुमची कराशी निगडित सर्व माहिती या दोन्हीशी लिंक असल्याने तुमची वैयक्तिक सर्व माहिती पासपोर्ट कार्यालयाला सहज मिळू शकेल. याशिवाय इतर माहितीही खरी आणि नेमकी भरणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या चौकशीमध्ये तुम्ही अडचणीच येऊ शकता.

३. शुल्क – पासपोर्टचे शुल्क हे दोन प्रकारात आकारले जाते. यामध्ये सामान्य पासपोर्टसाठीचे शुल्क आणि तात्काळ पासपोर्टसाठीचे शुल्क असे दोन प्रकार येतात. यामध्येही पासपोर्टच्या पानांप्रमाणे याची हे शुल्क बदलते.
३६ पानी पासपोर्टसाठी १५०० रुपये तर ६० पानी पासपोर्टसाठी २००० रुपये आकारले जातात. तात्काळच्या ३६ पानी पासपोर्टसाठी ३५०० रुपये तर तात्काळ ६० पानी पासपोर्टसाठी ४००० रुपये इतकी फी घेतली जाते. हे शुल्क ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय स्टेट बॅंकेच्या चलनाव्दारेही हे शुल्क भरता येते.

४. अपॉईंटमेंट – ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्याला एक वेळ दिली जाते. शुल्क भरल्यानंतर निवडलेल्या पासपोर्ट केंद्रासाठी तुम्ही अपॉईंटमेंट घेऊ शकता. एकदा शुल्क भरल्यानंतर त्यावर फक्त तीन वेळाच तुम्ही तुमची अपॉईंटमेंट शेड्यूल करु शकता. ही वेळ आपल्याला आपल्या सोयीनुसारही घेता येते. त्यादिवशी त्यावेळी ठरलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात जावे लागते. आवश्यक ती कागदपत्रे असली तरच त्याची तपासणी करुन मग आत सोडले जाते. यातही टोकन दिले जाते आणि टोकनवरील क्रमांकानुसार आपल्याला आत सोडले जाते. एकूण तीन काऊंटरवर तुम्हाला टप्प्याटप्प्याने जावे लागते. या सर्व पडताळणीतून योग्य पद्धतीने बाहेर पडलात तरच तुमचे काम होते. नाहीतर एखाद्या टप्प्यावर जरी अडकलात तर पुन्हा सगळी प्रक्रिया पहिल्यापासून करावी लागते.

५. या भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून त्याला काही कागदपत्रे जोडावी लागतात. आपला कायमचा पत्ता आणि मागील वर्षभरापासूनचा पत्ता याची माहिती असणे आवश्यक असते. हा पत्ता तपासण्यासाठी पोलिस घरी येतात आणि जर हा पत्ता चुकीचा आढळला तर ५ हजार रुपये दंड होऊ शकतो. आता यामध्ये वास्तव्याच्या पुराव्यासाठी कोणती कागदपत्रे चालू शकतात याविषयी माहिती घेऊया…
a. पाणीपट्टीची पावती
b. वीजबिल
c. मतदान ओळखपत्र
d. गॅस कनेक्शन
e. फोनबिल
f. प्रतिष्ठित कंपनीच्या लेटरहेडवरील एम्प्लॉयमेंट लेटर
g. आधारकार्ड
h. रजिस्टर्ड रेंट अॅग्रीमेंट
i. बँकेचे पासबुक
j. इन्कम टॅक्स ऑर्डर
k. पती किंवा पत्नीच्या पासपोर्टची झेरॉक्स

६. वयाचा दाखला देणारी कागरपत्रे – पत्त्याची कागदपत्रे ज्याप्रमाणे आवश्यक असतात त्याचप्रमाणे तुमचे वय बरोबर असणेही गरजेचे असते. त्यासाठीही तुम्हाला काही कागदपत्रे पोसपोर्टच्या फॉर्मसोबत जोडणे गरजेचे असते. कोणती आहेत ही कागदपत्रे पाहूयात…

a. जन्माचा दाखला
b. आधारकार्ड
c. मतदान ओळखपत्र
d. एलआयसी बाँड
e. शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टीफिकेट
f. ड्रायव्हिंग लायसन्स
g. पॅनकार्ड
h. सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हीसचा दाखला
i. अनाथ असल्यास अनाथालयाच्या लेटरहेडवर जन्मतारखेचा उल्लेख असलेलं पत्र

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...