मुलाचं टीव्ही पाहणं कसं थांबवायचं..?

👉 मुलाचं टीव्ही पाहणं कसं थांबवायचं..?

सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून लहान मुलांचा एकच प्रमुख उद्योग पहायला मिळतो तो म्हणजे टीव्ही बघणं. मुलं टीव्ही पाहत असताना टीव्ही जर बंद केला, की जोराजोराने ओरडातात, आदळआपट सुरु होते. मग नाइलाजाने त्यांना टीव्ही बघू द्यावाच लागतो. मग त्यांचं जेवणही टीव्ही समोरच. त्यामुळे पालक म्हणून आपल्याला असहाय्य वाटायला लागतं. आपल्या मुलाचं टीव्ही पाहणं कसं थांबवायचं? यासाठी काय करू शकता. त्याबद्दल जाणून घेऊयात...   

या प्रकरणातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या 'नाइलाजाचा', 'असहाय्यतेचा' भाग तुम्हाला वजा करावा लागेल. स्वत:च्या असहाय्यतेकडे तुम्ही पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही तुमच्या मुलाच्या हट्टाला घाबरताय आणि त्यालाच 'नाइलाज' आणि 'असहाय्यता' म्हणताय. मात्र काही बाबतीत तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे.

मुलांची ऊर्जा सक्रियतेने वापरली जाणं महत्त्वाचं असतं. नाहीतर ती आळसावतात आणि निष्क्रिय बनतात. पालकांनी मुलांना दिलेला वेळ ही मुलांसाठी पर्वणी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची गुंतवणूक असते. तुमच्या मुलाला तुमचा वेळ वेगळया तऱ्हेने मिळणं आवश्यक आहे. जर तुम्ही तिच्याशी खेळलात, तिच्याशी गप्पा मारल्यात, तिला ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टी करायला तिला जास्त वाव दिलात, तर तिची ऊर्जा विधायक दिशेने वळेल. आपोआपच टीव्ही बघण्यासारख्या निष्क्रिय कामासाठी तिच्याकडे कमी ऊर्जा शिल्लक राहील. त्यातून तुमचं आणि त्याच नातंही निरोगी होईल.

तुम्हाला त्याचा टीव्ही 'थांबवायचा' नाही तर टीव्हीला चांगले पर्याय निर्माण करायचे आहेत, ज्यामुळे त्याची टीव्हीची गरज कमी होईल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील व्हावं लागेल. त्याच्यात बदल होईपर्यंत धीर धरावा लागेल आणि मुख्य म्हणजे त्याच्या आक्रस्ताळ्या तंत्रांना बळी पडणं थांबवावं लागेल.

एक पालक म्हणून तुम्ही खालील काही गोष्टी करू शकता

टीव्हीला घराच्या सजावटीत सर्वात मध्यवर्ती स्थान नसावं. टीव्ही बेडरूममध्ये नसावा. टीव्हीवरचे कुठले कार्यक्रम मुलांनी बघावेत, हे पालकांनी ठरवावं. मुलांनी टीव्ही किती वेळ बघावा, हेही महत्त्वाचं आहे. लहान मुलं जितका कमी बघतील तितकं चांगलं! मोठ्या मुलांसाठी शाळेच्या दिवशी जास्तीत जास्त एक तास आणि सुटीच्या दिवशी दोन तास. टीव्हीवरच्या आवडत्या कार्यक्रमांनुसार वेळेचं नियोजन करावं, आपल्याला वेळ आहे म्हणून टीव्ही लावलाय असं होऊ नये.

गृहपाठ, खेळ या महत्त्वाच्या कार्यक्रमांनंतरच मुलांनी टीव्ही बघावा. झोपाण्याआधी निदान दोन तास तरी टीव्ही बंद होणं आवश्यक आहे. नाहीतर झोपेवर विपरीत परिणाम होतो. जेवताना (किंवा जेवण्यासाठी लालूच म्हणून) टीव्ही लावून देऊ नये. मुलांबरोबर पालकांनी काही कार्यक्रम बघावेत आणि त्या कार्यक्रमांविषयी मुलांशी चर्चा करावी. यामुळे मुलं कार्यक्रमातून काय घेतात हे कळतं. सर्वांत महत्त्वाचं हेच की, पालकांनी स्वत:च्या टीव्ही बघण्याकडे आत्मपरीक्षणात्मक भूमिकेतून बघावं आणि त्यात योग्य ते बदल घडवावेत. आपल्या मुलांबद्दल जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या पालकांसाठी हे सर्व आचरायला कठीण आहे का, हे तुम्हीच ठरवा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?