आम्हाला इंग्लिश येतंय
आम्हाला इंग्लिश येतंय
कशाला थयथय करतोस मित्रा
लक्ष कोण देतंय?
अरे आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
गुडमॉर्निंग, हाव आर यू?
कॉन्व्हरसेशन जमतंय
कमॉन, धिस इज द फ्यूचर ज्यात
आमचं मन रमतंय
गुढीपाडव्याला मेसेजमधे
"हॅपी न्यू इयर" येतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
चॉकलेटचे बंगले रिकामे झाले
भोलानाथ बोलत नाही
ट्विंकल ट्विंकल स्टरशिवाय
आम्हाला झोपच येत नाही
पाढ्यांची झाली टेबल्स
आणि चित्र ड्रॉइंगसारखं होतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
किंग शिवाजी वाचतात मुलं
शिवराय कसे कळणार
आणि मोठं होऊन न्यायासाठी
कुठल्या मुठी वळणार
स्वातंत्र्याच्या संग्रामाला
फ्रीडम अळणी करतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
जगाची भाषा इंग्लिश तर
राष्ट्रभाषा हिंदी आहे
खरं सांगतो मित्रा आता
मराठीला मंदी आहे
असं सगळं बोलायला
हे तोंड कसं चालतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
रेस्टॉरंट मधे डिनर होतायत
फेस्टिव्हलसाठी शॉपिंग
ट्रॅव्हल होतंय वर्क साठी
हेल्थ साठी जॉगिंग
कुठे नेली रे भाषा आपली
हे काय कानी पडतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
जन्मला की 'न्यू अरायवल'
मेला म्हणजे 'आरआयपी'
जो बघावं मोबाईलमधे
इंग्लिश लेटरंच टायपी
मग नाव मराठीत लिहितानाही
अक्षर अक्षर अडतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
करायचंय काय मराठी?
ते जुनं झालंय आता
स्कूल इंग्लिश, बाकी हिंदी
मराठीचं काय सांगता?
साडी, झब्बा सोयीस्करपणे
ट्रॅडिशनल वस्त्र ठरतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
कधीतरी कळेल महत्व
आशिर्वादाचं, ब्लेसिंग पुढे
कधीतरी जाणवेल ओल
अश्रूंमधली, टिअर्स पुढे
शेवटी 'साल्या' म्हणण्यातलं प्रेम सुद्धा
'डूड' म्हणून थोडंच कळतंय?
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी🙏
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
- स्वप्निल भिवाजी आव्हाड, माळवाडी. सिन्नर
Comments
Post a Comment