आई...

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम, राम, राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नये ओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

आई म्हणायची...
मरण यातना सोसताना
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतो
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतो.

त्याला कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बॅकेत पैसा भरत असतो.

तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकड पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ.

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता देता तरी
मान मारून हसत असतो.

तुमच्याकडूनं तसं त्याला
खरंच काही नको असतं
तुमचा यश पाहून त्याचं
अवघं पोट भरत असतं.

त्याच्या वेदना कुणालाही
कध्धीसुद्धा दिसत नाही
जग म्हणत, “आई एवढं
बाबा कधी सोसत नाही.”

त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्याला मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हालं
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहालं

तेव्हा म्हणालं, “आपला बाबा
खरंच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा...

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?