लेकरु..

।। कविता ।।

लेकरु...............

फ़क्त एकदा वाचा डोळ्यात नक्की पाणी येईल

चंद्रमोळी झोपडीत
गोजिरवाणी परी
पितृछत्र हरवलेलं
आई तेवढी घरी

भाकर तुकडा झाल्यावर
माय निघायची घरून
पुन्हा परत यायची
काबाडकष्ट करून

एक दिवस विटा गोटे
वाहत होती माय
शिडीवरून तोल गेला
मोडला तिचा पाय

बिछान्यावर खिळली तेव्हा
स्वतःवरच रागवायची
चिंता पडली होती तिला
रोजचा खर्च भागवायची

घरामध्ये नव्हता
अन्नाचा एकही कण
अन तशातच आला
दिवाळीचा सण

कोमेजलेली परी बघून
लागल्या आसवांच्या धारा
म्हणे माझ्या चिमण्या बाळा
कुठून आणू रे चारा ?

तिची ईवली लेकच मग
झाली तिची माय
म्हणे आई ! धीर सुटावा असं
घडलंय तरी काय ?

आसवे पुसली आईची
अन अशी बिलगली घट्ट
म्हणे सांग आई कधी तरी
मी केला का गं हट्ट ?

चिंता कशाला करते आई
रडणं जरा तु सोड
अगं माझं पोट तर आत्ता भरेल
फक्त एक पप्पी दे तु गोड

रिकामं आहे पोट
ह्यात काही वाद नाही
पण तुझ्या गोड मुक्याचा
पक्वान्नालाही स्वाद नाही

एकमेकींच्या मुक्याचा
भरवू एकमेकींना घास
आपलं पोट नक्की भरेल
आई मला आहे विश्वास

माय म्हणाली येरे कुशीत
माझ्या लाडक्या पाखरा
कुठून आली एवढी समज
सांगा माझ्या लेकरा ?

आसवे ओघळली ओठांवर
माय झाली मूक
अश्रूंनी तहान गेली
गेली मुका घेताच भूक.!!"

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.