'सारं  काही  स्वतःसाठी'

मंगेश पाड़गांवकरांची एक अत्यंत सुंदर अर्थवाही कविता !

'सारं  काही  स्वतःसाठी'

देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी

फुलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?

नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो ?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करीत असतो !

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला

स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तुतीला ?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला ?

सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं ,
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता !
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता !
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता !
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

-- मंगेश पाडगावकर

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?