जाणून घ्या भोगी म्हणजे काय..?

🤔 जाणून घ्या भोगी म्हणजे काय?

आज 'भोगी'. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. 'भोगी' हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. तसेच सासरच्या मुली 'भोगी'चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

'भोगी' हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी 'भोगी'ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

'भोगी'ची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.

तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच 'भोगी' देणे म्हणतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?